मनसेच्या राजकीय वाटचालीची झलक

Foto
औरंगाबाद :   महिनाभराच्या कालावधीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे दोन दौरे केले. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी स्वतः मनसेप्रमुख उपस्थित राहिल्याने राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिक शहरानंतर मनसेने औरंगाबाद शहरावर आता लक्ष केंद्रित केल्याची चर्चा होत आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मनसेची राजकीय वाटचाल यानिमित्त स्पष्ट झाली.
 गेल्या महिन्यात तीन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी अनेक बैठका घेतल्या. त्याच बरोबर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यवसायिक, डॉक्टर्स यांच्यासह अनेकांशी चर्चा केली होती. तर प्रसारमाध्यमांच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबतही त्यांनी चर्चा केल्याने मराठवाड्याच्या प्रश्नांवर मनसेने गंभीर विचार मंथन केल्याचे दिसून आले. यापूर्वी राज ठाकरे यांनी ज्या शहराकडे लक्ष दिले तेथे नियोजनबद्ध विकास झाला. नाशिक महानगरपालिका हे याचे मोठे उदाहरण ठरावे. मनसेने केलेल्या विकास कामांची नोंद सर्वच राजकीय पक्षांनी घेतली. नाशिकचा कचरा प्रश्न, स्वच्छता यासह नियोजनबद्ध विकासाची ब्ल्यू प्रिंट आता औरंगाबाद साठी राबविण्यात येणार असल्याचे सूतोवाच पक्ष नेत्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी अतिशय दूरदृष्टीने मराठवाड्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी औरंगाबादची निवड केली आहे. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांचे शहरावर कडे लक्ष वेधले गेले. पक्षाच्या मेळाव्यानंतर तातडीने त्यांनी औरंगाबाद दौरा केला होता हे विसरता येणार नाही. पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या त्याचबरोबर बंडखोरांवर कारवाई करीत त्यांनी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिनाभरातील राज ठाकरे यांचा हा दुसरा दौरा म्हणूनच राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो.
अमित ठाकरे यांचा दुसरा राजकीय दौरा
दरम्यान युवा नेते अमित ठाकरे पक्षात सक्रिय झाल्यानंतर आता त्यांचा हा दुसरा औरंगाबादचा महत्त्वाचा दौरा ठरला. यापूर्वी 2015 साली त्यांनी नारळीबाग येथील पावन गणेश मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी मनविसेचे राज्याध्यक्ष आदित्य शिरोडकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, तत्कालीन पदाधिकारी ललित सरदेशपांडे, विशाल आहेर, संजोग बडवे त्यांच्यासोबत होते. आता पक्षात महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर अमित ठाकरे यांना अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे हा महत्त्वाचा चेहरा ठरू शकतो. काल शोभायात्रेत तरुणाईने ज्या पद्धतीने अमित ठाकरे यांना समर्थन दिले. त्यावरून तरी मनसेची तरुणाईत चांगली क्रेज असल्याचे दिसून आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker